मानवी जीवनामध्ये ऐकण्याची क्रिया अत्यंत महत्वपूर्ण असून भाषा, भाषण आणि संज्ञापन कौशल्यांच्या विकासासाठी ही क्रिया सुलभपणे होणे आवश्यक आहे. श्रवणशक्ती कमी असल्यास शिकणे, संवाद साधणे आणि रोजचे सामाजिक व्यवहार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. श्रवणदोष अथवा कमी ऐकू येणे हे एक अदृश्य व्यंग असून ते इतरांच्या पटकन लक्षात येत नाही. त्यामुळेच लहान मुलामधील बहिरेपणा बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो. परंतु मुलाच्या जडणघडणीवर व योग्य वाढीवर त्याचा निश्चित परिणाम होतो. श्रवण मार्गांच्या परिपक्वतेसाठी सामान्य ध्वनिक वातावरण आवश्यक असते. संवेदी घटकांच्या कमतरतेमुळे या मार्गाच्या विकासावर परिणाम होतो. सुरुवातीच्या काळातच योग्य उपाययोजना न केल्यास मुल मुकबधीर होण्याची भीती असते.
आपल्या कानाचे बाह्यकर्ण, मध्यकर्ण व आंतकर्ण असे ३ मुख्य भाग आहेत. यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आंतकर्ण, यालाच इंग्रजीत कोक्लिया म्हटले जाते. या भागात मेंदूकडे आवाज पोहचवण्याचे महत्वाचे कार्य होते. ध्वनीचे सूक्ष्म विद्युत तरंगामध्ये रूपांतर करून हा आवाज मेंदूपर्यंत पोहचवला जातो. त्यानंतर मेंदू अन्य अवयवांना सूचना करून कार्य घडवतो. ऐकणे व बोलणे यांचा जवळचा संबंध आहे. एखादा शब्द ऐकूच आला नाही तर बाळ त्याचा पुनरुच्चार तरी कसा करणार? त्यामुळे एखादे मुल बोलत नसेल तर त्याची प्रथम कानाची तपासणी करणे आवश्यक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) व्याख्येनुसार एक किंवा दोन्ही कानांची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे कमी होणे म्हणजे बहिरेपणा होय. चांगल्या कानात ९० डेसिबलहून अधिक आवाज ऐकण्याची क्षमता कमी झाल्यास किंवा दोन्ही कानाची श्रवणक्षमता कमी झाल्यास त्याला बहिरेपणा म्हटले जाते. ऐकण्याची क्षमता अंशतः कमी होण्याच्या प्रक्रियेला “श्रवणविषयक दुर्बलता” म्हटले जाते. भारतासारख्या विकसनशील देशात असंख्य घटकांमुळे जन्मापूर्वी व नवजात बालकामध्ये बहिरेपणा येऊ शकतो. ग्रामीण भागात चांगल्या वैद्यकीय सेवेचा अभाव, अशिक्षितपणा, दारिद्र्य, जुन्या चालीरीती, रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरचे कमी प्रमाण, ऐकण्याच्या क्षमतेबाबतचे अज्ञान आदी कारणामुळे बहिरेपणाकडे दुर्लक्ष होताना दिसतो. याबाबत डोळसपणे पाहिल्यास व उपचारांसाठी थोडा खर्च केल्यास समाजातील अपंगांची संख्या आपण निश्चितच कमी करू शकतो.
१९७८ मध्ये नवजात बालकांमधील श्रवण क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी प्रथमच वापरण्यात आलेली OAE आणि ब्रेनस्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री (BERA) ही सर्वात विश्वसनीय तपासणी पद्धती ठरली आहे. कोक्लीयर आणि कोक्लीयर पुढील बहिरेपणा ओळखण्याच्या क्षमतेमुळे या तपासणी पद्धती आदर्श ठरल्या आहेत. ऑटो ऑकस्टीक इमिशन (OAE) म्हणजे कानाच्या आतील भागातून बाहेर पडणारा आवाज. आंतकर्ण व्यवस्थित काम करत नसेल तर या ध्वनीलहरी नष्ट होतात. त्यामुळे आंतकर्णाचे काम व्यवस्थित सुरु आहे कि नाही हे तपासणीसाठी OAE चा उपयोग होतो. वैद्यकीयदृष्ट्या OAE अत्यंत महत्वाचे आहेत. जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाची OAE तपासणी करून घेतल्यास त्याच्यातील कर्णदोषांचे लवकर निदान करून त्याप्रमाणे उपचार करता येतात. ही एक साधी, सोपी, मुल झोपलेले असतानाही करता येणारी तपासणी आहे.
मुलाच्या ६ व्या महिन्यापर्यंत तपासणी अत्यावश्यक
जर बालकांमधील श्रवणविषयक समस्यांचे निदान जन्मापासूनच्या 24 ते 36 महिन्यांपर्यंत होऊ शकले नाही, तर उपचारानंतरही (जसे श्रवण यंत्र, कोक्लियर इम्प्लांट, स्पीच थेरपी) बोलण्याच्या प्रक्रियेचा पूर्ण विकास होणे कठीण असते. मुलाच्या पहिल्या 6 महिन्यांच्या कालावधीत श्रवणविषयक दोषांकडे लक्ष न दिल्यास त्याच्या संवाद, शिक्षण, वर्तन, मानसिकता आणि एकूणच जीवनावर विपरीत परिणाम होतो. वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत कोक्लियर इम्प्लांट करणाऱ्या मुलामध्ये त्याहून अधिक वयात उपचार करणाऱ्यापेक्षा चांगले परिणाम दिसून येतात. उच्च जन्म दर, सुविधांचा अभाव अशा अनेक कारणांनी बालवयातील श्रवण दोष ही देशासमोरील मोठी समस्या बनली आहे. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी २५ हजाराहून अधिक कर्णबधिर मुलांचा जन्म होतो. त्यातील 30% मुले व त्यांच्या पालकांना बहिरेपणाबद्दल माहितीच नसते.
दुर्लक्ष केल्यास बोलण्यातही समस्या
नवजात बालकांची ६ महिन्याच्याआत श्रवण चाचणी, निदान आणि त्यानुसार उपाययोजना केल्यास देशातील कर्णबधिरांची वाढती संख्या रोखणे सहज शक्य आहे. पायाभूत समस्यांमुळे सर्व नवजात मुलांची तपासणी शक्य नसल्यास उच्च-जोखीम (High Risk) असलेल्या नवजात मुलांची तपासणी होणे आवश्यक आहे. तथापि, 50% मुलामध्ये श्रवण दोष दर्शवणारी कोणतीच लक्षणे दिसत नसल्याने जन्मानंतर प्रत्येक मुलाची OAE आणि त्यानंतर आवश्यकता भासल्यास BERA ही तपासणी करणेच उत्तम होय. कोक्लियर श्रवणशक्ती कमी असणाऱ्या नवजात मुलांसाठी OAE ही सोपी चाचणी आहे. तर BERA ही श्रवणमार्गातील दोष तपासणीसाठीची वेळखाऊ पण अचूक चाचणी आहे. या चाचणीमुळे श्रवण कमजोरीचा प्रकार स्पष्ट होत असल्याने बोलण्यास होणाऱ्या विलंबामागील कारण शोधण्यासही मदत होते. भारतात श्रवण दोष निदानाची प्रक्रिया वयाच्या चौथ्या ते पाचव्या वर्षांपासून सुरु होते. मात्र तोपर्यंत मेंदूची भाषा विकासाची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. त्यामुळे अशा मुलामध्ये उपचारानंतरही बोलण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.
जागरुकते अभावी श्रवण दोषांकडे दुर्लक्ष
वैद्यकीय आणि पॅरामेडिकल अधिकाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शनाच अभाव व त्यामुळे निदान होण्यास झालेला विलंब हे बहिरेपणाचे मुख्य कारण बनले आहे. विविध सरकारी योजना जनतेपर्यंत पोहचवण्यात आलेलं अपयश आणि ENT चाचण्याबाबत वैद्यकीय अधिकार्याच्या मार्गदर्शनाचा अभाव, पालकांमध्ये शिक्षण व जागरूकतेचा अभाव यामुळे मुलाच्या श्रवण दोषांची लवकर कल्पनाच येत नाही. त्यासाठी देशव्यापी शिक्षण आणि जनजागृतीची आवश्यकता आहे. बहिरेपणा अथवा अत्यंत कमी असलेली श्रवण क्षमता वाढविण्यासाठी कोक्लीयर इम्प्लांट हा अत्यंत प्रभावी उपाय वैद्यकशास्त्रात उपलब्ध आहे. मात्र आर्थिक अडचणी व त्याबाबत योग्य माहिती नसल्याने कोक्लीयर इम्प्लांटची निवड करण्यात पालक असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे बाधित लोकांना पारदर्शी पद्वधतीने प्रभावीपणे या सुविधा पुरवण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले पाहिजे.
पालकामधील जागरुकता, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अचूक मार्गदर्शन, योग्य वेळेत झालेली श्रवण तपासणी व उपाययोजना व सरकारी योजना तळागाळात पोह्चल्यास बहिरेपणाच्या समस्येवर नक्कीच मात करता येईल. त्याद्वारे समाजातील अपंगांची वाढती संख्या आपल्याला निश्चितच रोखता येईल.