fbpx

बहिरेपणाची समस्या, कारणे आणि उपाय कोणती

अनेकांमध्ये बहिरेपणाची समस्या दिसून येते. वास्तविक, ऐकू न येण्यामागची कारणे आणि त्यावरचे इलाज कोणते हे जाणून घेण्यापूर्वी कानाची रचना कशी असते आणि ऐकण्याची क्षमता कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असते हे जाणून घेतले तर उपाय करून घेणे देखील अधिक सुकर होऊ शकते.

कानाची रचना समजून घेताना कानाचे तीन भाग असतात. बाह्यकान, मध्यकान आणि अंतर्गत कान. बाह्यकान वातावरणातून ध्वनीतरंगांच्या रूपाने आवाज ग्रहण करतो. हे तरंग कॅनलमधून जाऊन इअर ड्रमपर्यंत पोहोचतात. त्यामुळे इअर ड्रम कंप पावू लागतो.

या कंपनांमुळे मध्य कानात असणार्‍या तीन अतिशय छोट्या हाडांमध्ये गती निर्माण होते आणि या गतीमुळे कानातील अंतर्गत भागात असणारे द्रव हालणे सुरू होते. आतील कानात हिअर सेल्स अर्थात ऐकण्याची क्षमता असणार्‍या पेशी असतात. त्या या द्रवाच्या गतीमुळे थोड्या वळतात आणि इलेक्ट्रिक पल्सच्या रूपात मेंदूकडे संदेश पोहोचवितात. हा संदेश आपल्याला शब्द आणि ध्वनीच्या रूपात ऐकू येतो.

नुकसान होण्याचे प्रकार :- हिअरिंग लॉस म्हणजे ऐकू येण्यातील दोष किंवा नुकसान होय. ते दोन प्रकारचे असू शकते.

1) कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस :- हे नुकसान कानाच्या बाहेरील आणि मधल्या भागातून आलेल्या एखाद्या समस्येमुळे होते. याला आजारपणामुळे होणारे बहिरेपण देखील म्हणतात. याची कारणे म्हणजे कानातून पू वाहणे किंवा संसर्ग होणे, कानांच्या हाडात काही गडबड होणे, कानांच्या पडद्याचे नुकसान होणे म्हणजे त्याला भोक पडणे किंवा गाठ होणे.

2) सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस – कानाचे हे नुकसान आतील भागात निर्माण झालेल्या गडबडीमुळे होते. ज्यावेळी हिअर सेल्स नष्ट होऊ लागतात किंवा योग्य प्रकारे काम करू शकत नाही तेव्हा असे होते. कानात जवळपास 15 हजार विशिष्ट हिअरिंग सेल्स असतात. त्यानंतर मज्जातंतू असतात. हिअर सेल्सला मज्जातंतूंची सुरुवात म्हणता येऊ शकते. त्यांच्यामुळेच आपण ऐकू शकतो. मात्र, वय वाढते तसे या पेशी नष्ट होऊ लागतात. त्यामुळे मज्जातंतूही कमकुवत बनतात आणि ऐकण्याची शक्ती कमी होते.

बहिरेपणामागची कारणे – वय वाढणे, काही विशिष्ट प्रकारची औषधे म्हणजे जेन्टामायसिनचे इंजेक्शन, जीवाणूंचा संसर्ग इत्यादी वापरण्यात येणारी औषधे यांचा वापर, मधुमेह आणि हार्मोन्सचे असंतुलन यांसारखे आजार तसेच मेनिंजायटिस, गोवर, गलगंड इत्यादी आजारांचा परिणाम ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो. तसेच खूप जास्त मोठा आवाज हे देखील एक कारण आहे.

लक्षणे – ऐकण्याची क्षमता कमी होण्याची सुरुवातीची लक्षणे फारशी सुस्पष्ट नसतात. मात्र, ऐकण्याच्या क्षमतेत आलेली कमतरता काळानुसार आणखी कमी होत जाते याकडे लक्ष द्यावे. अशा वेळी शक्य तितक्या लवकर इलाज केला पाहिजे. सामान्य बोलणे ऐकण्यात अडचण होत असेल, खास करून पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ असेल तर, बोलताना वारंवार काय काय म्हणून विचारणे, फोनवर बोलताना समोरच्या व्यक्तीचे ऐकण्यास अडचण होणे, इतरांच्या तुलनेत अधिक जोरात आवाजात टीव्ही किंवा संगीत ऐकणे, नैसर्गिक आवाज म्हणजे पावसाचा किंवा पक्ष्यांची किलबिल ऐकण्यास अक्षम होणे, नवजात बाळाचा आवाज ऐकू न शकणे ही लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे.

उपचार – संसर्गामुळे ऐकण्याची क्षमता कमी झाली असेल तर औषधाने ती बरी करता येते. पडदा डॅमेज झाला असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते. बर्‍याचदा यावर औषधांनीही उपचार होऊ शकतो. मज्जातंतूंमध्ये काही कमतरता निर्माण झाल्यास त्यांचे नुकसान झाले असेल तर ते बरे करता येत नाही. अशा वेळी हिअरिंग एडचा वापर करता येऊ शकतो. यामुळे त्वरित उपचार होतो आणि अडचण वाढण्यास रोखता येऊ शकते. हिअरिंग एडचा वापर केला नाही तर मज्जातंतूंवरील ताण वाढतो आणि समस्या वाढत जाते.

ऐकण्याची क्षमता जन्मतःच कमी असण्याची शक्यता असते म्हणून प्रत्येक मुलाच्या ऐकण्याच्या क्षमतेची तपासणी केली पाहिजे. यासाठी नाक, कान, घसा तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. 6 महिन्यांपर्यंत मूल आवाजाकडे लक्ष देत नसेल किंवा दोन वर्षे वयापर्यंत एकही शब्द बोलू शकत नसेल तर त्वरित तपासणी करावी. पाच वर्षांपर्यंत मुलांच्या ऐकण्याच्या, समजण्याच्या आणि बोलण्याच्या क्षमतेचा पूर्ण विकास होतो. त्यासाठी याच वयापर्यंत त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेत सुधारणा झाली तर चांगले असते.

Leave a Comment

Book Free Test & Trail

Enable Notifications OK -