बहिरेपणा आणि श्रवणदोष कसा टाळावा, तसेच कान आणि श्रवणविषयक काळजी कशी घ्यावी याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ३ मार्च हा जागतिक श्रवण दिन म्हणून पाळला जातो. अनेकांच्या श्रवणविषयक समस्यांचे निदान होत नाही आणि ते महत्त्वाचे ध्वनी आणि वाक्प्रचार गमावत असल्याचे तपासणीतून समोर येत आहे.
बहिरेपणाची समस्या हाताळण्याची पहिली पायरी म्हणजे एखाद्याच्या श्रवणशक्तीचे मूल्यांकन करणे होय. आतील कानात केसांसारख्या नाजूक पेशी असतात. ज्या रक्तप्रवाहातील बदलांसाठी अत्यंत संवेदनशील असतात. या पेशींचे नुकसान झाले तर श्रवणशक्ती कमी होते. उच्च रक्तदाब आणि हृदयविकारामुळे देखील कानातल्या नाजूक यंत्रणांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे कमी ऐकू येत असेल तर वेळीच सावध होत कानाचे आरोग्य तपासा,
ऐकू कमी येण्याची कारणे
- वृद्धत्व : आतील कानाच्या संरचनेचे ऱ्हास कालांतराने होते.
- मोठा आवाज. मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्याने कानाच्या आतील पेशींचे नुकसान होऊ शकते.
- आनुवंशिकता.
- पिठाची गिरणी, बांधकाम किंवा कारखाना आदी कामाच्या ठिकाणच्या मोठ्या आवाजामुळे बहिरेपणा येऊ शकतो
- अँटिबायोटिक जेंटॅमायसिन, सिल्डेनाफिल आणि काही केमोथेरपी औषधे यांसारखी औषधे आतील कानाला इजा करू शकतात.
बहिरेपणा कसा टाळावा ?
सर्व प्रकारचे श्रवण कमी होणे टाळता येण्यासारखे नसले तरी, वय-संबंधित श्रवण कमी होणे किंवा ध्वनी प्रदूषणाने कमी होणाऱ्या श्रवणशक्तीचा धोका कमी करता येतो. नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपान टाळणे, मधुमेह नियंत्रणात ठेवणे, मोठ्या आवाजाच्या ठिकाणी काम न करणे, हेडफोनचा अतिवापर टाळणे.
गोंगाटाच्या वातावरणात श्रवणाचे रक्षण न केल्यास बहिरेपणा येण्याचा धोका असतो. प्रत्येकाने कानाचे आरोग्य सांभाळावे. कमी ऐकू येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
नुकसान होण्याचे प्रकार :- हिअरिंग लॉस म्हणजे ऐकू येण्यातील दोष किंवा नुकसान होय. ते दोन प्रकारचे असू शकते.
1) कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस :- हे नुकसान कानाच्या बाहेरील आणि मधल्या भागातून आलेल्या एखाद्या समस्येमुळे होते. याला आजारपणामुळे होणारे बहिरेपण देखील म्हणतात. याची कारणे म्हणजे कानातून पू वाहणे किंवा संसर्ग होणे, कानांच्या हाडात काही गडबड होणे, कानांच्या पडद्याचे नुकसान होणे म्हणजे त्याला भोक पडणे किंवा गाठ होणे.
2) सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस – कानाचे हे नुकसान आतील भागात निर्माण झालेल्या गडबडीमुळे होते. ज्यावेळी हिअर सेल्स नष्ट होऊ लागतात किंवा योग्य प्रकारे काम करू शकत नाही तेव्हा असे होते. कानात जवळपास 15 हजार विशिष्ट हिअरिंग सेल्स असतात. त्यानंतर मज्जातंतू असतात. हिअर सेल्सला मज्जातंतूंची सुरुवात म्हणता येऊ शकते. त्यांच्यामुळेच आपण ऐकू शकतो. मात्र, वय वाढते तसे या पेशी नष्ट होऊ लागतात. त्यामुळे मज्जातंतूही कमकुवत बनतात आणि ऐकण्याची शक्ती कमी होते.
बहिरेपणामागची कारणे – वय वाढणे, काही विशिष्ट प्रकारची औषधे म्हणजे जेन्टामायसिनचे इंजेक्शन, जीवाणूंचा संसर्ग इत्यादी वापरण्यात येणारी औषधे यांचा वापर, मधुमेह आणि हार्मोन्सचे असंतुलन यांसारखे आजार तसेच मेनिंजायटिस, गोवर, गलगंड इत्यादी आजारांचा परिणाम ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो. तसेच खूप जास्त मोठा आवाज हे देखील एक कारण आहे.
लक्षणे – ऐकण्याची क्षमता कमी होण्याची सुरुवातीची लक्षणे फारशी सुस्पष्ट नसतात. मात्र, ऐकण्याच्या क्षमतेत आलेली कमतरता काळानुसार आणखी कमी होत जाते याकडे लक्ष द्यावे. अशा वेळी शक्य तितक्या लवकर इलाज केला पाहिजे. सामान्य बोलणे ऐकण्यात अडचण होत असेल, खास करून पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ असेल तर, बोलताना वारंवार काय काय म्हणून विचारणे, फोनवर बोलताना समोरच्या व्यक्तीचे ऐकण्यास अडचण होणे, इतरांच्या तुलनेत अधिक जोरात आवाजात टीव्ही किंवा संगीत ऐकणे, नैसर्गिक आवाज म्हणजे पावसाचा किंवा पक्ष्यांची किलबिल ऐकण्यास अक्षम होणे, नवजात बाळाचा आवाज ऐकू न शकणे ही लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे.