fbpx

कानाची काळजी कशी घ्यावी?

कानाचे बाहेरचा, मधला आणि आतला असे तीन भाग आहेत. बाहेरचा कान खूप महत्त्वाचा असतो. बाहेरचा कान ज्या ध्वनिलहरी आतल्या कानासाठी धोकादायक आहेत, त्याचे फिल्टरेशन करतो.

कानात वेगवेगळे दागिने घालण्याची फॅशन आली आहे. कानाच्या मऊसर भागावर (Ear Lobe वर) एखादा दागिना घातला तर फारसं इन्फेक्शन होत नाही. पण कानाच्या पाळीच्या कडक भागावर एखादा दागिना घातला तर इन्फेक्शन होऊ शकतं. इन्फेक्शन झालं तर कान वेडावाकडा होऊ शकतो. त्यामुळे इन्फेक्शन झालं तर लगेच डॉक्टरांकडे जायला हवं आणि उपचार घ्यायला हवेत.

आता आपण कानाच्या इयर कॅनलची माहिती घेऊया. इअर कॅनलची त्वचा अतिशय नाजूक असते. याबाबतीत प्रश्न येतो की रोज कान साफ करण्याची गरज असते का? तर अजिबात नाही. नैसर्गिकरीत्या मळ का कानाच्या पडद्याजवळ तयार होतो. कानाच्या पडद्याजवळ तयार झालेला मळ हळूहळू बाहेर फेकला जातो. अशा वेळी कान साफ करण्यासाठी काडी वापरायची का? अजिबात नाही. काडी वापरली तर तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन मळ आत ढकलाल. त्यामुळे कानात काडी घालणं आजिबात चांगलं नाही. इयर कॅनलच्या त्वचेला काडी घातल्यामुळे जखम झाली आणि त्यावर पाणी गेलं तर बुरशीचं इन्फेक्शन होतं. इयर कॅनल भुयारासारखा आहे. इथं सूर्यप्रकाश किंवा हवा जात नाही आणि त्यामुळे बुरशी तयार होऊ शकते. बुरशीचं इन्फेक्शन झालं तर कान कोरडा ठेवावा. कानात एकही थेंब पाणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी. वारंवार कानात बुरशी होत असेल तर आपल्याला डायबेटीस तर नाही ना? याची तपासणी करणं गरजेचं आहे. डायबेटीसमध्ये बाहेरच्या कानाचे इन्फेक्शन अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण बाजूचं हाडं पोखरलं जाऊ शकतं.

जर कानाच्या पडद्याला छिद्र नसेल किंवा कानाच्या पडद्याला कसलंही इन्फेक्शन नसेल तर बेबी ऑईल वापरता येऊ शकतं. कानात तेल घातल्यामुळे कानाच्या त्वचेला ल्युब्रिकेशन मिळतं.

कानाचा पडदा, तीन हाडांची साखळी, नाक आणि कान जोडणारी ट्यूब या सर्वांसह मधला कान बनलेला आहे. कानाच्या पडद्यामागे हवा असावीच लागते अशी निसर्गाची रचना आहे. आता कानाच्या मध्यल्या भागात हवा कशी पोचवावी? त्यासाठी एक व्यायाम आहे. मोठा श्वास घेऊन गाल फुगवावेत आणि ती हवा कानावाटे जाऊ द्यावी. यामुळे कानाचा पडदा किंचित बाहेर आल्यासारखा वाटेल. मधल्या कानाचे असे व्हेंटिलेशन केल्यामुळे मध्यल्या कानाचे प्रॉब्लेम होणार नाहीत. मधल्या कानात वारंवार सर्दी साठून दडा बसणे हा प्रॉब्लेम झाला तरीही गाल फुगवण्याचा व्यायाम उपयुक्त ठरू शकतो. कधीकधी सर्दी कानाच्या मधल्या भागात साठून त्याचा दाब इतका वाढतो की कानाचा पडदा फाटू शकतो. अशा वेळी नाकावाटे बाहेर न येऊ शकलेली सर्दी कानावाटे बाहेर येण्यास सुरुवात होते.

अशा वेळी घाबरून न जाता कान कोरडा ठेवावा. कानात पाणी जाऊ नये याची काळजी घ्यावी. कानाचा पडदा सर्दीने जरी फुटला असला तरी तो पूर्ण भरून येण्याची शक्यता आहे. पण असं इन्फेक्शन वारंवार होत असेल तर हे काळजीचे कारण आहे. कानातून सतत पाणी, पू, रक्त येत असेल तर काळजीचं कारण आहे. कान कायम कोरडाच असला पाहिजे. जर सतत कानातून पाणी येत असेल तर चांगलं लक्षण नाही. कान नेहमी कोरडा असायलाच हवा. पाणी येत असेल तर काहीतरी पोखरणारं इन्फेक्शन झालंय हे नक्की. यामुळे पडद्याला छिद्र पडू शकतं. हे इन्फेक्शन पुढे जाऊन कानाच्या हाडांची साखळी पोखरू शकतं. कानाचं छप्पर म्हणजेच मेंदूचा बेस. या इन्फेक्शनकडे दुलर्क्ष केलं तर ते मेंदूपर्यंत पोहचू शकतं. चेहऱ्याची हालचाल नियंत्रण ठेवणारी नस कानातूनच जाते. इन्फेक्शन पुढे गेलं तर त्या नसेचा पॅरालीसिस होऊन चेहऱ्याचा पॅरेलिसिस शकतो.

आता हाडांची साखळी काही कारणांमुळे काम करत नसली तर ऑपरेशन करता येऊ शकते. कानाच्या पडद्यामागे हवा नेणारी ट्यूब आपल्याला आधी ओपन करावी लागते. निसर्गाने कानाला पाडलेले छिद्र जर शस्त्रक्रियेद्वारे घाईने बंद केले आणि त्याचबरोबर कान आणि नाक यांना जोडणारी ट्यूबही बंद असेल तर अशा वेळी पडद्याच्या मागे हवा जात नाही तर निसर्ग पुन्हा पडदा फोडून टाकतो. म्हणून कानाच्या पडद्याचे छिद्र बंद करण्याची सर्जरी ही निसर्गाच्या रचनेप्रमाणेच व्हायला हवी. याचाच अर्थ असा की कान आणि नाक यांना जोडणारी ट्यूब प्रथम उघडायला हवी. सर्दी बंद करण्यासाठी उपचार करायला हवेत आणि मग नाकातून कानात हवा जायला लागली की ट्यूब मोकळी आहे, असं समजावं आणि मग नवीन पडदा (शस्त्रक्रियेद्वारे) तयार करणे योग्य ठरेल. मी माझ्या वडिलांकडून हेच शिकले की कोणतंही काम निसर्गाच्या अनुसरून झालं तर यश मिळतंच.

Leave a Comment

Book Free Test & Trail

Enable Notifications OK -